#INDvsENG भारत विरुद्ध इंग्लंड आज दुसरा एकदिवसीय सामना
![#INDvsENG India v England second ODI today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/1616659339-5755.jpg)
पुणे – भारत विरुद्ध इंग्लंड तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवून भारताने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेचा दुसरा सामना आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर दुपारी १.३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
पहिल्या सामन्यात खेळलेला भारताचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे पुढील दोन सामने खेळू शकणार नाही आहे. त्यामुळे आता दुसऱ्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत भारतीय संघात एका नवीन खेळाडूला जागा मिळू शकते. इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० क्रिकेट कारकीर्दीला झोकात प्रारंभ करणाऱ्या सूर्यकुमार यादवला दुसऱ्या वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते. ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर अय्यरची जागा घेऊ शकतो पण कर्णधार कोहली आणि संघव्यवस्थापनाकडे ऋषभ पंतचाही पर्याय आहे. ऋषभ पंत हादेखील इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी-२० मालिकेत भन्नाट फॉर्ममध्ये होता. त्यामुळे आता सूर्यकुमार आणि पंत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु रोहितला विश्रांती दिल्यास शुबमन गिल याला संधी मिळू शकेल, तर के. एल. राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. एकदिवसीय मालिकेसाठी राहुलकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी राहील.