अण्णाद्रमुकचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; आश्वासनांचा पाऊस
चेन्नई – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याबरोबरच जाहीरनामेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. तामिळनाडूत सध्या सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुकनेही रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून अण्णाद्रमुकने मतदारांवर जणू आश्वासनांचा पाऊसच पाडला. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत देण्यात येईल, अशी वचने अण्णाद्रमकने जाहीरनाम्यातून दिली आहेत.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,85,339 वर
त्याचबरोबर नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहार सुरू करणार, असेही अण्णाद्रमुकने म्हटले आहे. तर वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे नामांतर तामिळनाडू उच्च न्यायालय असे करण्याचे आणि श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व व राहण्याचा परवाना देण्याचे आश्वासन अण्णाद्रमुकने दिले आहे. त्याचबरोबर सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करणार, असेही अण्णाद्रमुकने म्हटले आहे.
या जाहीरनाम्यात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मातृत्व रजा वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले असून अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यातून केली आहे.