कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट
भिवंडी – देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याशिवाय ज्यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशा रुग्णांसाठी ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान भिवंडी शहरात मंगळवारी सकाळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊन एका आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.
वाचा :-नागपुरात कोरोनाचा उद्रेक; 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भाग्यनगर कामतघर इथे हा प्रकार घडला. 41 वर्षांच्या सुखदेव महिपती किर्दत यांचा मृत्यू झाला आहे. सुखदेव यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुखदेव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शवविच्छेदनानंतरच नेमके कारण समजू शकेल अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.