breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: भाजपकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अडवण्याचा प्रयत्न

मुंबई – पुण्यामधील पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसाठी त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसेच मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीने या प्रकरणामध्ये राठोड यांच्या राजीनामा घेण्याच्या बाजूने मत मांडलेलं आहे. तर दुसरीकडे अद्याप राठोड यांच्यावर ठाकरे सरकारने काहीच कारवाई न केल्याबद्दल भाजपा आक्रमक भूमिका घेत आज पनवेलमध्ये आंदोलन केलं. पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं.

महापौर कविता चौतमोल यांच्यासह सभापती मोनिका महानवर आणि इतर नगरसेविकांसहीत भाजपाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज कळंबोली येथे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी, ‘शरद पवार, जागे व्हा’ अशा घोषणा देत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हाॅटेलसमोरील महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. कळंबोली पोलिसांनी वेळीच धाव घेऊन महापौर चौतमोल यांच्यासह महिला व पुरुष अशा ३५ आंदोलकांना ताब्यात घेतले. मार खावा लागला तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची संधी आयतीच मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button