महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांची पालिकेवर धडक; राष्ट्रवादीचा आंदोलनात सहभाग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/d0e3405b9311388c951ae92b8ef5f80b_XL-1.jpg)
पिंपरी – प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत प्रस्तावित पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने आज शाळेला टाळे ठोकण्यात आले. मात्र, येथील विद्यार्थ्यांचे दळवीनगर येथील शाळेत स्थलांतर होण्यास विरोध असल्याने त्यांनी आज महापालिकेसमोर निदर्शने केली.
विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यासह पालक उपस्थित आहेत. प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली. शाळेतील साहित्य देखील हलविण्यात आले. परंतु, याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. या निर्णयाला विरोध करत विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. परंतु, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी आणि प्रशासनाने ही शाळा दळवीनगर परिसरात स्थलांतरित केली आहे.
विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही, असे पालकांचे मत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वा-यावर सोडू नये. महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. त्यासाठी पालकांनी विविध मार्गांनी आंदोलनही केले आहे. याविरोधात आज बुधवारी विद्यार्थ्यांनी पालिकेला भेट देऊन आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी राष्ट्रगीत गाणार होते, मात्र, त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले.