‘मुख्यमंत्री महोदय…काय चाललयं आपल्या राज्यात ?’ ‘त्या’ घटनेनंतर चित्रा वाघ यांचा सवाल
![File charges against Sanjay Raut, Gulabrao Patil too: Chitra Wagh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/chitra-वाघ.jpg)
मुंबई – काही दिवसांपुर्वीच भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आग लागल्याने 10 नवजात बालकांना आपले प्राण गमवावा लागला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला आहे. चिमुकल्याने पोलिओच्या डोसऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याने या मुलांचे प्रकृती बिघडली. या घटनेनंतर भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, मुख्यमंत्री महोदय…..काय चाललयं आपल्या राज्यात ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, इतका कसा हलगर्जीपणा? भंडारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीमुळे 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे आणि आता या 12 बालकांच्या जिवाशी खेळ ? मुख्यमंत्री महोदय…..काय चाललयं आपल्या राज्यात ?, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्याने 12 बालकांना रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.