निर्दयी घटना ! केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर 38 जणांकडून लैंगिक अत्याचार
तिरुवनंतपुरम – केरळमधून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत निर्दयी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 38 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. जेव्हा निर्भया केंद्रात या १७ वर्षीय पीडितीचे काऊंसलिंग सेशन सुरू होते. तेव्हा तिने 38 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, 38 नराधमांविरोधात लैंगिक शोषणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यापैकी 33 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सध्या अटकेत असलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
सर्किल पोलीस निरिक्षक मोहम्मद हनिफा यांनी सांगितले की, ‘बाल गृहातून निघाल्यानंतर पीडिता काही काळापर्यंत बेपत्ता होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती पलक्कडमध्ये असल्याची माहिती मिळाली. तिथून तिला निर्भया केंद्रात आणण्यात आले.’ काऊंसलिंग सेशन दरम्यान पीडितेने निर्भया सेंटरमध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेची माहिती दिली.’