महाराष्ट्रातील सर्व सरकारी दवाखान्यांची विभाग निहाय स्वतंत्र तपासणी करा

– संभाजी ब्रिगेडचे निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन
पिंपरी | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी रुग्णालये सुधारली पाहिजे. पुणे जिल्ह्यातील कुठल्याही सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा नसते. सक्षम डॉक्टर, औषधांचा पुरवठा आणि अद्ययावत यंत्रणा नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्याचे ऑडिट करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या निमित्ताने सर्व सरकारी दवाखान्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, मोहिनी रणदिवे, जयदीप रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ग्रामीण भागातून एखादी महिला प्रसूतीसाठी आली असेल किंवा एखादा सर्पदंशाचा रुग्ण असेल तर त्याला ऍडमिट करून घेतले जात नाही. त्या रुग्णाला खाजगी हॉस्पिटल पाठविले जाते. सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरचेच ते खाजगी हॉस्पिटल देखील असते. त्यामुळे सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा दिली गेली पाहिजे. रुग्ण आणि नागरिकांच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेतली पाहिजे. मात्र तशी काळजी घेतली जात नाही. या निमित्ताने सर्व सरकारी दवाखान्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.




