भाजप आमदार प्रसाद लाड यांना चौकशीस हजर राहण्याचे आदेश; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
![Mumbai Police sends notice to BJP MLA Prasad Lad for Financial malpractice in BMC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Mumbai-Police-sends-notice-to-BJP-MLA-Prasad-Lad-for-Financial-malpractice-in-BMC.jpg)
भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धक्का दिला आहे. त्यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून प्रसाद लाड ओळखले जातात.
देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.