राजकीय दबावामुळे १८ ठेकेदारांवर कारवाई नाही
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचा आरोप
पिंपरी | प्रतिनिधी
बोगस एफडीआर प्रकरणी १८ ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र राजकीय दबावामुळे अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसने केला आहे. त्वरित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात हि मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेत १८ ठेकेदारांनी बनावट एफडीआर सादर केले. पैशांचा अपहार केला आहे. हा प्रकार गंभीर आहे. या ठेकेदारांना केवळ काळ्या यादीत टाकण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशन चावरिया यांनी केली.