बोगस एफडीआर प्रकरणी गुन्हा दाखल करा; भ्रष्टाचार निर्मुलन समितीची मागणी
![FIR should be registered against 18 fake contractor over fake FDR cases demands Corruption Eradication Committee](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pcmc-13.jpg)
पिंपरी |महाईन्यूज |
पिंपरी चिंचवड महापालिकेतील बोगस एफडीआर प्रकरणातील 18 ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शांताराम खुडे यांनी केली आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्याही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहे.
शहर विकास कामाचे कंत्राटासाठी डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देणे बंधनकारक असतं. पण महापालिकेतील अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या संगनमतीने ही कंत्राट बोगस एफडीआरच्या माध्यमातून देण्यात आले. त्यामुळे जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे. यासोबतच वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले असताना त्यांना पुन्हा कामावर रूजू करण्यात आले आहे. त्यामुळेे या सर्व गोष्टींकडे आयुक्त खुद्द कानाडोळा करत आहेत, असा आरोप खुडे यांनी या पत्राद्वारे केला आहे.
येत्या आठ दिवसात हे दोन्ही प्रकरण निकाली काढून ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावे, तसेच रॉय यांच्यावर चौकशी करावी अन्यथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून आयुक्तांवरच सहगुन्हेगार ग्राह्य धरून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.