वाचाच! 1 जानेवारी पासून फास्टॅग बंधनकारक
देशात नव वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. 1 जानेवारी 100 टक्के टोल फास्टॅगद्वारे वसूल केला जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाची घोषण केली आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
फास्टॅग म्हणजे काय
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असते. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.





