‘येथील गुंतवणूक खेचण्यासाठी काही फेरीवाले बाहेरून येतात’; ‘या’ शिवसेना नेत्याने लगावला आदित्यनाथ यांना टोला
![Shivsena leader strike CM Yogi adityanath](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Shivsena-leader-strike-CM-Yogi-adityanath.jpeg)
मुंबई – ”मुंबई आणि महाराष्ट्रात गुंतवणूक सातत्याने होत असते. त्यामुळे येथे फेरीवालेही मोठ्या प्रमाणात येत असतात. येथील गुंतवणूक खेचण्यासाठी काही फेरीवाले बाहेरून येतात; पण मुंबईतील गुंतवणूक बाहेर जाणार नाही,” असा चिमटा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काढला. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत विविध गुंतवणूकदारांशी काल झालेल्या करार प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अप्रत्यक्षपणे योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत गुंतवणूकदारांशी चर्चा केली. उत्तर प्रदेशात चित्रपट नगरी सुरु करण्याचेही तेथील भाजप सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आदित्यनाथ यांनी बाॅलिवूडच्या निर्मात्यांची भेट घेतली होती. अभिनेता अक्षय कुमारही त्यांना भेटला होता. त्यावरुन शिवसेना नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाकाळात मोठी गुंतवणूक आली असून आपले राज्य हे सुपर मॅग्नेटिक पॉवर असल्याचा अभिमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आज विविध गुंतवणूकदारांशी “मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत झालेल्या कराराप्रसंगी ते बोलत होते.