पुनावळेत भरधाव वेगाने जाणारी कार पलटी; प्रवाशी जखमी
![पुनावळेत भरधाव वेगाने जाणारी कार पलटी; प्रवाशी जखमी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201222-WA0004.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. दरम्यान कार पलटी झाल्याने कारचे नुकसान झाले तसेच कार मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. ही घटना आज (मंगळवारी, दि. 22) दुपारी पाच वाजताच्या सुमारास पुनावळे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची व्हेरना कार पुनावळे मधील एका रस्त्याने जात होती. भरधाव वेगात जाणाऱ्या या कार समोर अचानक रिक्षा आली. त्यामुळे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले.
भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये शिरली आणि पलटी झाली. त्यात तीन दुकानांचे नुकसान झाले. एका फर्निचरच्या दुकानात कार शिरली. कारमधून चार अल्पवयीन मुले जात होती. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नसल्याचे म्हटले जात आहे. कार मधील मुलांना किरकोळ इजा झाली आहे. कारचे आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.