वाढीव बीज बिलावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
![“काहींना इतकी मळमळ आहे, की ते म्हणतात…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; मुंबई पालिकेसाठी दिला नारा!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Devendra-Fadanvis-Winter-Session.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अंतिम दिवस चांगलाच गोंधळात पार पडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करुन फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. नितीन राऊत यांना घोषणा करा असं आम्ही सांगितले नव्हते असंही यावेळी ते म्हणाले. वीज बिलाच्या सवलतीवरुन काय झालं अशी विचारणा फडणवीसांनी या वेळी केली.
“मुख्यमंत्री महाविकास आघाडीत विसंवाद नाही, असं सांगतात. पण वीज बिलावरुन प्रत्येकजण वेगेगळं वक्तव्य करत आहेत. वापरलेल्या वीजेचं बिल भरण्यासंबंधी माझं काही म्हणणं नाही. पण जी वीज वापरलीच नाही त्याचं बिल कसं भऱणार?. महाविकास आघाडीतील संवाद निर्णयात दिसू द्या. माझं तर सरळ म्हणणं आहे की, वीज बिलासंबंधी घोषणा करुन सरकारने फसवणूक केली आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी गोंधळ सुरु झाला असता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते योग्य भूमिका मांडत असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सरासरी बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीन थांबवली पाहिजे. अन्यथा हे विषय सातत्याने येत राहतात. मीटर, घऱ नाही त्यालाही बिल जातं अशी ही पद्धत आहे”.
दरम्यान यावेळी विरोधक आणि सत्ताधारी समोर आल्यानंतर नाना पटोले यांनी स्पष्ट केलं की, “ही पद्दत या सरकारची नाही, अनेक वर्षांची परंपरा आहे. ही पद्धत बदलली पाहिजे हेच मला सांगायचं आहे. हे मागच्या काळात नव्हतं असा काही भाग नाही. त्यामुळे हा राजकीय विषय नाही”.