शहरातील शाळा ३ जानेवारी पर्यंत बंदच
– महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती
पिंपरी| प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात अजुनही कोरोना विषाणूची भिती कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा/ महाविद्यालय अद्यापही बंदच आहेत. कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेवुन ३ जानेवारी २०२१ नंतरच हे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.
नगरसेवक सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, शांताराम भालेकर, माऊली थोरात, मंडलाध्यक्ष विजय शिनकर, शहर उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, अजय पाताडे, आण्णा गर्जे, नंदू भोगले, रवी देशपांडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष ऋषीकेश रासकर, किसान आघाडी अध्यक्ष संतोष तापकीर, अनुसूचित जाती अध्यक्ष सुभाष सरोदे, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष रघुनंदन घुले, भाजयुमोच्या प्रदेश सदस्या देवयानी भिंगारकर, अजित कुलथे, कामगार आघाडीच्या प्रदेश सदस्या राजश्री जायभाय, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, सोशल मिडिया युवा अध्यक्षा पूजा आल्हाट, आशा काळे, सोनम जांभूळकर आदी प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सध्या पालकांचे संमतीपत्र घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त १ हजार १३२ संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तुर्तास शाळा सुरु करणे योग्य राहणार नाही. या अगोदरच शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेण्याचे शासन आदेशात नमूद केलेले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने, शाळा/ महाविद्यालयातील 9 ते 12 वी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 आजाराबाबत चाचणी पुर्ण झाली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारी २०२१ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शाळा बंदच रहाणार आहेत.