तरुणांच्या रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र व व्यवसाय शिक्षण विभागात समन्वय हवा – मंत्री शंभुराज देसाई
![Coordination between District Industries Center and Business Education Department is required for employment of youth - Minister Shambhuraj Desai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/shambhuraje-desai.jpg)
औंध येथील राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यमंत्री देसाई यांची भेट
पिंपरी । प्रतिनिधी
उद्योग आस्थापनांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बरोबरच औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित रोजगार मिळावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाने समन्वयाने काम करावे, अशा सुचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी दिल्या.
औंध येथील राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यमंत्री देसाई यांनी भेट देऊन विभागाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक अनिल गावित, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपायुक्त शरद आंगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश सायगावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी(सातारा)सचिन धुमाळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त (सातारा) सचिन जाधव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व्यवसाय निहाय अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध होण्यासाठी संस्था स्तरावर प्रयत्न करावेत, असे सांगून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, सीएनसी लॅब, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशा प्रगत अभ्यासक्रमांच्या कार्यशाळा पुण्यातील औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असल्याबद्दल राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण व प्रशिक्षणाचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या नामांकित कंपन्यांच्या कार्यशाळांना तसेच परंपरागत आणि अत्याधुनिक अभ्यासक्रमाच्या कार्यशाळांना भेट देऊन पाहणी केली. सहसंचालक अनिल गावीत यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले.
………………………….