शिवसेनेने फुंकले पालिका निवडणुकीचे रणशिंग, मातब्बर कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/4.jpeg)
- राजेश आरसुळ, ज्योती भालके, संदीप भालके यांनी बांधले शिवबंधन
- खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने झाला पक्षप्रवेश
पिंपरी / महाईन्यूज
चिंचवडमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवानेते राजेश आरसुळ, वाल्हेकरवाडी येथे बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या ज्योती भालके आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप भालके यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते त्यांनी हातावर शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक कार्यकर्ते उत्सूक आहेत. या माध्यमातून शिवसेनेने आगामी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोऱ्हाळे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, युवासेनेचे विश्वजित बारणे, अभिजीत गोफण, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, युवानेते राजेश आरसुळ, ज्योती भालके, संदीप भालके यांनी शिवसेनेचा पवित्र असा भगवा ध्वज खांद्यावर घेतला आहे. त्याचे स्मरण कायम ठेवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणाऱ्या शिवसैनिकांप्रमाणे गरजूंना मदतीचा हात देणारा, अन्याय तिथे शिवसेना म्हणून उभा राहणारा शिवसैनिक या नात्याने समाजामध्ये विधायक कामे करावीत. स्वतःची एक स्वतंत्र चांगले काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करावी. 2022 च्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिकांनी तत्पर राहणाच्या सूचना दिल्या.
जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नवीन मतदार नोंदणी, मतदार पुनर्निरीक्षण मोहीम व शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवावे. पक्षाच्या आणि समाजाच्या कामामध्ये सक्रिय राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शहरप्रमुख योगेश बाबर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अॅड. उर्मिला काळभोर यांनी आभार मानले.