कर्तव्य बजावताना वीरमरण येणे, ही पोलिसांसाठी अभिमानाची बाब – आयुक्त कृष्ण प्रकाश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/krushna-prakash-1010000_202011522830.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कर्तव्य बजावत असताना वीरमरण येणे ही पोलिसांसाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे. पोलीस अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात. आता पोलीसच खरे योद्धे होऊन दहशतवादी, दरोडेखोर, नक्षलवादी, समाजकंटक व्यक्तींपासून समाजाचे रक्षण करत आहेत, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
मुंबईतील २६ नाेव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, सहायक आयुक्त आर. आर. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
कृष्ण प्रकाश म्हणाले, देशाची, राज्याची आंतरिक सुरक्षा ही पोलिसांच्या हातात आहे. समाजाचे रक्षण करणे, वाईट वृत्तींचा नायनाट करणे हाच आपला परमधर्म आहे. संविधान हा देशाचा भक्कम पाया समजला जातो. संविधानाने आपल्याला दिलेला अधिकाराचा आपण नेहमी सन्मान केला पाहीजे.
सुधीर हिरेमठ यांनी संविधान दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना संविधान वाचून शपथ दिली. अक्षय घोळवे व संतोष महिश्वरी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.