राज्यातील प्रमुख शहरात लॉकडाऊन जाहीर करा; माजी खासदार गजानन बाबर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Babar.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
राज्यातील प्रमुख शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दिवाळीत सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जा तसेच मास्क न वापरणे यामुळे रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आणखी रुग्ण वाढण्याचे शक्यता आहे त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरात लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
गजानन बाबर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात असे म्हटले आहे की, राज्यातील प्रमुख शहरांत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहेत.
दिवाळीनंतर प्रामुख्याने हि वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये अजूनही निष्काळजीपणा आहे त्यामुळे लाॅकडाऊन करण्याची हिच योग्य वेळ आहे.
राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता अजूनही शाळा बंद ठेवणंच सोईस्कर होईल असं बाबर यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी कोव्हीड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत असे न ती पुन्हा सुरू करावीत व बेडची क्षमता वाढवावी असे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन करण्याआधी दोन दिवस नागरिकांना सुचित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.