मुंबईकर अनुभवणार माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल : 15 अंशाच्या खाली घसरेल पारा!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/download-1-1.jpg)
यंदा केवळ तीन महिन्याचा कडक हिवाळा: हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईत डिसेंबर पर्यंत 15 अंशाच्या खाली तर पुण्याचा 7 अंशाखाली नाशिक पुन्हा 4 अंशाखाली तर नागपूर 5 अंशाखाली असा घसरेल पारा त्यामुळे यंदा मुंबईकरांना घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल अनुभवत हुडहुडी भरेल. पुणेकर व नागपूरकर गारठतील. तसेच यंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण किनारपट्टीवर व पश्चिम महाराष्ट्र लवकरच गारठेल. 15 डिसेंबरला मान्सून संपणे अपेक्षित असल्याने हिवाळा आणि पावसाळा असे दोन ऋतूंची सरमिसळ पहायला मिळू शकेल. 20 डिसेंबर पासून रॅपिड थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले दिसून येईल असे संशोधन निष्कर्ष गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र व भारतील इतर राज्यांतील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना ‘अंदाज नव्हे माहिती!’ ही मोफत हवामान सेवा पुरविणारे हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रासाठी जोहरे यांनी जाहीर केला हेल्थ अलर्ट
ब्लडप्रेशर, हार्ट अॅटॅक, दमा अस्थमा आदी आजारांच्या रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असून डॉक्टरी सल्ल्याने रक्त पातळ होण्यासाठीच्या घेत असलेल्या व इतर गोळ्या वेळेवर घेणे आवश्यक आहे. तसेच लहान मुले तसेच जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करीत महाराष्ट्रासाठी ‘हेल्थ अलर्ट’ देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.
प्रा किरणकुमार जोहरे हे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) पुणेचे माजी शास्त्रज्ञ आहेत. सध्या ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक मधील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात. आपल्याला संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ दिलीप धोंडगे यांच्या कडून नेहमीच समाजोपयोगी हवामान अलर्ट व माहिती देण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळते असे ते आवर्जून सांगतात.
20 डिसेंबर ते साधारणपणे 20 मार्च या विषुवदिनापर्यंत अशी केवळ तीन महिन्यांचा हिवाळा यंदा असू शकेल. साडे 23 अंश कललेल्या पृथ्वीच्या आसामुळे ती स्वतः भोवती फिरतांना म्हणजे परीवलन व सुर्याभोवती परीभ्रमनामुळे असे घडले असे यामागचे विज्ञान देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र थिजेल
यंदा मुंबई बरोबरच पुण्याचा पारा देखील 7 अंशाखाली तर नागपूरचा पारा 5 अंशाखाली तर नाशिक जिल्ह्यात मधील निफाड चे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठू शकेल अशी दाट शक्यता असल्याची माहिती प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. भौगोलिक परिस्थिती नुसार विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त व वेगाने घसरण दिसून येईल. त्यानंतर मराठवाड्यात औरंगाबाद आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये वेगाने तापमानात घसरण दिसून येईल. महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर आणि पानांवर गोठलेले दवबिंदू दिसून येऊ शकेल असे ही ते म्हणाले.
यंदा काय बदल
गेल्या वर्षी थंडी 15 नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती यावर्षी ती 15 डिसेंबर नंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल.
सध्या उत्तरेकडून वारे दक्षिणेकडे जात आहेत परीणामी थंडी उत्तर ते दक्षिण अशी भारतात वाढत आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी विदर्भ, नंतर मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात जास्त घसरण होते आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात यंदा थंडी मागील वर्षीपेक्षा जास्त असेल हे यंदा वैशिष्टय़पूर्ण असेल कारण पाऊस जास्त झाला आहे जमिनीत पाण्याचा अंश जास्त आहे हे शास्त्रीय कारण त्या मागे आहे असे भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
दिवसा ‘नोव्हेंबर हिट’ आणि रात्री ‘कोल्ड शाॅक’ आताचे ‘न्यू नाॅर्मल’ असणार असून बदललेला मान्सून पॅटर्न व बदललेल्या वादळाच्या पॅटर्न मध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असणार आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे दिवसभर उकाडा आणि साधारणपणे सायंकाळी साडे चार वाजेनंतर तापमानात वेगाने होणारी घसरण आणि रात्री महाराष्ट्रातील तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले असे नोव्हेंबर 2020 मध्ये नवीन वातावरण आपणास अनुभवायला मिळणार आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
उपाय आवश्यक
‘आॅक्टोबर हिट’ ऐवजी यापुढे ‘नोव्हेंबर हिट’ आपण अनुभवणार आहोत तसेच कमाल आणि किमान तापमान यातील तफावत 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने ‘कोल्ड शाॅक’ चा झटका माणसांबरोबर प्राणी व वनस्पतींना देखील बसणार आहे. परीणामी काळजी आवश्यक आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पहाटे आणि सायंकाळी योग्य काळजी घेत शेताच्या बांधावर शेकोटी पेटवणे किंवा मोठे उष्णता देणारे हॅलोजन लॅम्प लावण्याचा उपाय करता येईल तर द्राक्ष वाचविण्यासाठी वृत्तपत्रातील कागदाचा सुयोग्य वापर शेतकरी करु शकतील असे उपाय देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी सुचविले आहे.
दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातील काही भागात विस्कळीत स्वरूपात यंदा दिवाळीच्या दिवसांत किंवा तयानंतर लगेचच विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही, मान्सून आणि चक्रीवादळे तसेच थंडीचे स्वरूप कसे असेल असे ही ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी त्रिसुत्री जोहरे ‘बुस्टरडोस’
भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टरडोस देणारी हवामान वकृषी विभागाचे एकत्रिकरण, हवामान खात्याचे अंशतः खासगीकरण व अकाउंटिबिलीटी तसेच रिस्पॉन्सिबिलिटी घेत देशाचे नुकसान करणारी चुकीची हवामान माहिती देणार्या शास्त्रज्ञांवर कायदेशीरपणे शिक्षेची तरतूदसोबत शास्त्रज्ञांच्या पगारातून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे प्रावधान अशी त्रिसुत्री या बाबत देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी आपले संशोधन निष्कर्षांबरोबरच सांगितली आहे.
मान्सून आणि चक्रीवादळे
यंदा आॅक्टोबर मध्ये यंदा एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही. मान्सून संपतांना चक्रीवादळांची निर्मिती होते. अशी चक्रीवादळे, पाऊस आणि गारपीट हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच डिसेंबर व जानेवारी 2021 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल.