पाकने भारतीय उपउच्चायुक्ताला केले पाचारण
शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा केला दावा
इस्लामाबाद – पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारताच्या हंगामी उपउच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे भारताने शस्त्रसंधीचा भंग करून केलेल्या गोळीबाराबद्दल विचारणा केली. भारताने काल हा गोळीबार केला त्यात पाकिस्तानी हद्दीतील एक नागरीक ठार झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
चिरीकोट सेक्टर मध्ये भारताने हा गोळीबार केल्याचे त्यांनी म्हटले असून या बद्दल त्यांनी पाकिस्तानी बाजूचा निषेधही नोंदवला आहे. सीमा भागात भारतीय बाजूकडून सतत गोळीबार केला जात असून त्यात नागरी वस्त्यांना लक्ष केले जात आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. चालू वर्षात आत्तापर्यंत भारताने 1100 वेळा शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यात पाकिस्तानी हद्दीतील 29 नागरीक ठार झाले असून 117 जण जखमी झाले आहेत. सन 2017 पासून भारताकडून हा प्रक्षोभक गोळीबार सातत्याने केला आहे.
भारताचा हा आक्रमकपणा प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारा असून सीमा भागातही त्यामुळे कायमच अस्थिरता निर्माण होत आहे असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने सन 2003 साली झालेला शस्त्रसंधीचा करार पुर्णपण अंमलात आणला पाहिजे असेही पाकिस्तानने भारताला सुनावत मोठाच कांगावा केला आहे.