‘मराठ्यां’च्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटील यांची खरमरीत टीका
![‘It is not enough to simply replace the Commissioner of Police, but…’; Chandrakant Patil is aggressive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/0Pune_Chandrakant_Patil.jpg)
मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचं हे पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. अशी जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यासंदर्भातला हा आरोप चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर ट्विट करून केला आहे.
राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे.
आज ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका. या मोर्चासाठी प्रतिकात्मक मशालींचा वापर केला जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी 5 वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, ज्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे परंतु आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रक्रिया रखडली आहे, यांच्याबाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या आशा विविध मागण्या असणार आहेत. आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई समन्वयक राजन घाग यांनी ही माहिती दिली.