रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते “मेन्यू ऑन रेल्स’ या नव्या ऍपचा शुभारंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/piyush-goya-1.jpg)
नवी दिल्ली – रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज “मेन्यू ऑन रेल्स’ या नव्या ऍपचा शुभारंभ झाला. प्रवासादरम्यान पुरवण्यात येणाऱ्या खानपान सेवेची माहिती या ऍपवर आहे. सर्व रेल्वेगाड्यांमधल्या मेन्यूची माहिती या ऍपवर असेल. तिकिटाचे आरक्षण करतानाच खानपानसेवेसाठी नोंदणी कराव्या लागणाऱ्या राजधानी/शताब्दी/दुरान्तो गटातील रेल्वेगाड्यांमधले तसेच तेजस आणि गतिमान गाड्यांमधले आहारबेत या ऍपवर असतील. पदार्थांच्या करासहीत किमतीही असतील. ऍण्ड्राईड आणि आयओएसवर हे ऍप उपलब्ध असेल.
याशिवाय रेल्वे पॅसेंजर ग्रीव्हयन्स रिड्रेसल ऍण्ड मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा उत्तर रेल्वेने (दिल्ली विभाग) विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे विविध निकषांवर आपल्या कामगिरीचे मूल्यांकन कराराला रेल्वेला साहाय्य मिळणार आहे. प्रवाशांच्या तक्रार निवारणीची प्रक्रिया जलद गतीने आणि अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज या यंत्रणेंतर्गत “रेल मदद’ या ऍपचा शुभारंभ केला.
“रेल मदद’ मोबाईल ऍप्लिकेशन फॉर डिझायर्ड असिस्टन्स ड्यूरिंग ट्रॅव्हल मोबाईल ऍप असून प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती प्रवाशांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. विविध हेल्पलाईन क्रमांक यावर असतील.