महिलांना लोकल प्रवास करू द्या, राज्य सरकारची रेल्वे बोर्डाला पुन्हा विनंती
![8 hours duty of women police; Big decision of the state government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/udhav.jpg)
मुंबई – मुंबई आणि उपनगरांतील महिला प्रवासांचा वेळ वाचावा याकरता लोकल सुरू करावेत अशी विनंती पुन्हा एकदा राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला विनंती केली होती. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच निर्णय न झाल्याने राज्याने पुन्हा एकदा रेल्वो बोर्डाला साकडे घातले आहेत. पुन्हा एकदा राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवास करु द्यावा असं या पत्रात म्हटलं आहे. सध्याच्या घडीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व आस्थापनं सुरू होत असल्याने महिला नोकरदावर्गही कामाला जाण्यास लागल्या आहेत. मात्र, त्यांचा अर्धा वेळ प्रवासातच जात असल्याने निदान महिलांकरता तरी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुभा दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. त्यामुळे सरसकट महिलांना लोकलचा प्रवास करता आलाच नाही. यावरुन काँग्रेसने भाजपावर आरोप केले आहेत.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला महिलांसाठी रेल्वे सुरु करावीशी वाटत नाही. त्यांना यामागे राजकारण करायचं आहे असा आरोप केला होता. तसंच मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद करणारे भाजपा नेते हे आता महिलांसाठी लोकल सुरु व्हावी म्हणून घंटानाद का करत नाहीत असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करा असं पत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिलं आहे.