उपमुख्यमंत्र्याच्या तोतया खासगी सचिवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![Jugar khelenā चारya four jānāna vakad polisankadun stuck; Three hundred and ninety-five evicted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Crime.jpg)
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करीत खासगी सचिव असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. तुषार चिंतामणी तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांना त्याने प्रकरण मिटवून घ्या; अन्यथा कडक कारवाई होईल, अशी दमबाजी केली होती.
कामदार यांना तावरे याने फोन करीत तुमच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार आली आहे. मी ती तुम्हाला व्हॉटस्ऍप केली आहे, असे सांगितले. कामदार यांनी ती पाहिली असता त्यांच्या बांधकाम व्यवसायासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या नावे तक्रार केल्याचे दिसून आले.
याबाबत तात्काळ कारवाई करावी, असा आदेश देत पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त झोन 9 मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एन. नगर, मुंबई यांच्या नावे रिमार्क मारत उपमुख्यमंत्री पवार यांची सही होती.
कामदार यांनी घाबरून जात तावरे यांच्याशी संपर्क केला. त्यावर त्याने तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत. ते तीन दिवसांत मिटवून घ्या, अन्यथा तुमच्याविरोधात कडक कारवाई होईल, असे सांगितले. रिमार्क उपमुख्यमंत्र्यांचाच आहे का, अशी विचारणा केली असता त्याने “हो’ असे उत्तर दिले. कामदार यांना शंका आल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. यावर अशा नावाचा कोणीही व्यक्ती पवार यांच्याकडे काम करीत नसल्याचे सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांची कामदार यांनी भेट घेतली. मुसळे यांनी रिसतर पोलीस तक्रार करा, असा सल्ला दिला. त्यानुसार तावरेविरोधात तोतयागिरी केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणात आणखी कोणी साथीदार आहेत का, गुन्ह्याचा उद्देश काय होता, आरोपीने अजून काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास उपनिरीक्षक पद्मराज गंपले करीत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
बारामती व परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक अथवा खासगी सचिव, त्यांच्या कार्यालयातून बोलतो आहे, असे सांगून तोतयागिरी झालेली असल्यास शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.