रहिवाशांना पूर्वकल्पना न देताच निगडी प्राधिकरणातील सिमाभिंतीवर पालिकेची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201014-WA0002.jpg)
- सिध्दीविनायक हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांचा संताप
- भाजपचे अनुप मोरे यांनी आयुक्तांना विचारला जाब
पिंपरी / महाईन्यूज
निगडी प्राधिकरण सेक्टर 24 मधील सिध्दीविनायक हाऊसिंग सोसायटीची सिमाभींत रहिवाशांना पूर्वकल्पना न देता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिका-यांनी कारवाई करून तोडून टाकली. याचा प्रतिकार करणा-या सोसायटीतील महिलांना अर्वाच्य भाषेत बोलून त्यांच्या राहत्या घरांवर देखील कारावाई करण्याची धमकी अधिका-यांनी दिली. याप्रकरणी उपभियंता नरेश रोहिला, सहकारी उपभियंता प्रतिक जाधव, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील या अधिका-यांनी निगडी प्राधिकरण सेक्टर 24 मधील सिध्दीविनायक हाऊसिंग सोसायटीची सिमाभींत पाडण्यासंदर्भात सोसायटीमधील रहिवाशांना पूर्वकल्पना दिली नाही. काल मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानकपणे सोसायटीत येऊन सिमाभींत पाडण्यात आली. हा प्रकार निदर्शनास येताच अनुप मोरे आणि सोसायटीतील रहिवाशी महिलांनी कारवाईचा प्रतिकार केला. मात्र, अतिक्रमण पथकातील अधिका-यांनी पोलिसांच्या दंडेलशाहिचा धाक दाखवत सिमाभिंतीवर कारवाई केली. यासंदर्भात रहिवाशांना लेखी अथवा तोंडी कळविण्याचे अधिका-यांचे काम होते. मात्र, रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता उर्मटपणे कारवाई केल्याने सोसायटीमधील नागरिकांचा संताप अनावर झाला. उर्मटपणे कारवाई करणा-या अधिका-यांना त्यांनी या कारवाईचा जाब विचारला. त्यावर सोसायटीच्या चेअरमन पल्लवी रावळ यांनी भिंत पाडण्याच्या अर्जावर स्वाक्षरी केल्याचा आरोप उपभियंता नरेश रोहिला यांनी केला. या आरोपाचे रावळ यांनी त्यांच्या समोरच खंडण केले.
कारवाईचा जाब विचारणा-या महिलांना रोहिला यांनी अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा कराल तर तुमच्या अनधिकृत घरांवर कारवाई करतो, अशी धमकी त्यांनी महिलांना दिली. कारवाई करताना तेथील वाहने देखील अधिका-यांनी नागरिकांना काढू दिली नाहीत. त्यामुळे भिंत पाडण्याची अधिका-यांना एवढी घाई कशाची झाली होती, असा प्रश्न अनुप मोरे यांनी उपस्थित केला. मोरे यांनी नागरिकांची बाजू घेऊन अधिका-यांच्या चुकीच्या कामाचा विरोध केला. चुकीच्या पध्दतीने काम करणा-या उपभियंता नरेश रोहिला, सहकारी उपभियंता प्रतिक जाधव, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे यांच्यावर त्वारित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोसायटीधारकांच्या वतीने अनुप मोरे यांनी केली आहे. माजी उपमहापौर तथा प्रभाग 15 च्या विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांच्या उपस्थितीत आज बुधवारी (दि. 14) आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी तेथील रहिवाशांना महापालिकेकडून पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, सिध्दीविनायक हाऊसिंग सोसायटीच्या सिमाभिंतीवर कारवाई करण्यापूर्वी संबंधीत अधिका-यांनी रहिवाशांना कोणतीही कल्पना दिली नाही. काल मंगळवारी (दि. 13) सकाळी थेटपणे सिमाभींत पाडून अधिका-यांनी नागरिकांचा रोष ओढवून घेतला. ही कारवाई हेतुपुरस्सर आणि चुकीच्या पध्दतीने झाली आहे. संबंधित अधिका-यांवर आयुक्तांनी कठोर कारवाई करावी.
अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा