रिझर्व बँकेने स्थगित केलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या व्याजाचा उद्या निर्णय होणार
नवी दिल्ली– रिझर्व बँकेने स्थगित केलेल्या कर्जांवरील हप्त्यांच्या व्याजासंदर्भातील निर्णय आता सर्वोच्च न्यायालय उद्या १४ ऑक्टोंबरला जाहीर करणार आहे. या संदर्भातील २४ प्रकरणांवर सुनावणी झाल्यानंतर व्याजासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण, न्याय. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने आज सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कर्जदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गृह, वाहन, वैयक्तिक, क्रेडीट कार्ड आणि इतर कर्जांवरील हप्त्यांना ६ महिन्यांची स्थगिती दिली होती. त्यामुळे या कालावधीत बँका किंवा वित्त संस्थांना ही कर्जे थकीत म्हणून घोषित करता येत नव्हती. मात्र आता या स्थगित हप्त्यांवरील व्याजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याबाबत केंद्र सरकार आणि आरबीआयने शपथपत्र दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याबाबतचा निर्णय उद्या जाहीर करणार आहे.