शिवाजी सहकारी बॅंकेच्या संचालकांचा ग्राहकांच्या 400 कोटींवर डल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/A-Gallery_1.jpg)
- पैसे परत मिळवण्यासाठी ग्राहकांचा खटाटोप
- आमदारांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत केल्या तकारी
पिंपरी | महाईन्यूज
पुण्यातील शिवाजीनगर येथील शिवाजी सहकारी बॅंकेतील संचालक मंडळातील लोकांनी 90 हजार सभासदांचे 400 कोटी हडप केले असून ग्राहकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ग्राहक आज हयात देखील नाहीत. त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बॅंक परत सुरू करण्यात यावी, अशी मागणी मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.
शिवाजी सहकारी बॅंकेत ज्येष्ठ नागरिकांनी व्याजाच्या पैशासाठी आपली सर्व रक्कम गुंतवली. मात्र, बॅंकेच्या संचालक मंडळातील काही लोकांनी 90 हजार सभासदांच्या 400 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी बॅंकेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. अनिल भोसले यांच्यासह अन्य चार संचालक तुरुंगात सजा भोगत आहेत. बॅंकेचा 97 टक्के एनपीए आहे. त्यामुळे ही बॅंक पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही. बॅंकेचे व्यवहार 2019 पासून बंद आहेत. सध्या बॅंकेच्या कामकाजासाठी प्रशासक नेमलेला आहे, अशी माहिती मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. आर. माडगुळकर आणि सचिव वाय. आर. आपटे यांनी दिली आहे.
ग्राहकांना डिपॉझीट, इन्शुरन्स नियमाखाली 5 लाख रुपये रक्कमेचे संरक्षण आहे. त्याचा प्रिमियम घेतला जातो. ही बॅंक पुन्हा सुरू होण्यासाठी रिझर्व बॅंक प्रयत्न करत नाही. त्यामुळे ग्राहकांचे विम्याचे पैसे अडकले आहेत. यासंदर्भात मुंबई आरबीआयला पत्र देण्यात आले आहे. तरी देखील या बॅंकेच्या कामकाजासाठी पाऊल उचलले जात नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पुण्यातील भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे. आता आरबीआयच अशा बॅंकांना पाठिशी घालत असल्याचा संशय बळावत असल्याचे माडगुळकर आणि आपटे यांनी म्हटले आहे.
ही बॅंक त्वरीत सुरू करावी किंवा लिक्वीडेट करावी. 90 हजार ग्राहकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यात यावेत, अशी मागणी माडगुळकर आणि आपटे यांनी केली आहे.