40 रुपयांसाठी मित्राचा गळा दाबला; तरुणाचा गुदमरुन मृत्यू, कोल्हापुुरातील धक्कादायक घटना
![मोशीत एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/police-crime-scene-murder-do-not-cross-shut.jpg)
कोल्हापूर | केवळ चाळीस रुपयाची उधारी वसूल करण्याच्या कारणावरुन मित्राची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. इचलकरंजीतील करवीर तालुक्यात ही घटना घडली. येथील अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) या तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. वसगडे तालुका करवीर येथे काल रात्री उशिरा घडली. या प्रकरणातील संशयित आरोपी जगदीश कांबळे याला गांधीनगर पोलीसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे.
करवीर तालुक्यातील वसगडे येथे राहणारा अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) आणि जगदिश नायकु कांबळे (वय 27) हे दोघे मित्र होते. नेहमीप्रमाणे काल रात्री ते समाजमंदिरात दारु पित बसले होते. अनिल कांबळे हा जगदीश कांबळे याचे 40 रुपये देणे लागत होता. ती रक्कम जगदीश परत मागत होता. यामुळे दोघांत वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
जगदीश कांबळेने गळा आवळल्याने अनिल कांबळेचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला. तो निपचिप पडल्यानंतर जगदीश घटनास्थळावरुन पसार झाला. ही घटना समजताच काही युवक आणि नातेवाईकांनी समाजमंदिरात धाव घेतली. त्यांनी तात्काळ अनिलला गांधीनगर इथल्या वसाहत रुग्नालयात दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.