मंचरमधील दोन पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/लाचखोर.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे ग्रामीण पोलीस दलातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
शुक्रवारी सायंकाळी या दोघांना पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सापळा पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांनी दिली. क्रिकेट बेटिंग वरून लाच घेतली असू प्रशांत सुरेश भुजबळ (वय 30 ) आणि कृष्णदेव सुभाष पाबळे (वय 32)अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील तक्रारदाराला क्रिकेट बेटिंग चालवतो म्हणून 30 सप्टेंबरला पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर देखील बेटिंग सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दोघांनी 1 ऑक्टोबरला 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अखेर 2 ऑक्टोबरला 20 हजार रुपयांची लाच घेताना पाबळे आणि भुजबळ दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.