देशात 24 तासांत 86 हजार 52 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ;58 लाखांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा भारतातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 58 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंता आता प्रचंड वाढली आहे. मागील 24 तासांत देशात 86 हजार 52 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 1 हजार 141 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह भारताची एकूण कोरोना रुग्णसंख्या 58 लाख 18 हजार 571 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 92 हजार 290 इतका झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9 लाख 70 हजार 116 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
तसेच दुसरीकडे देशातील कोरोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 13 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात 13 लाख 80 हजार चाचण्या करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.





