तासगाव तालुक्यात तुफान पावसामुळे सरनोबत मंदिर कोसळले

सांगली जिल्ह्यात झालेल्या मुसऴधार पावसामुळे तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील सरनोबत मंदिर कोसळले आहे. भिंती व पाया कमकुवत झाल्याने हे मंदिरच कोसळले असून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरालगत असलेले सरनोबत मंदिर रविवारी कोसळले. पावसामुळे मंदिराच्या भिंती कमकुवत बनल्या होत्या, तर भिंतीखालील माती उखडली होती. कळसासह पूर्ण मंदिर संरक्षक भिंत आणि पत्र्याच्या शेडवर पडले. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
सहा वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून सिद्धेश्वर मंदिर परिसरात सरनोबत मंदिर बांधण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे या मंदिराच्या भिंतींखालील मातीचा भराव उखडला होता. मंदिराच्या भिंती कमकुवत बनल्या होत्या. हे मंदिर रविवारी सकाळी शिखरासह उन्मळून पडले. यात शेजारच्या घराची संरक्षक भिंत आणि पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले.





