मराठा आरक्षण! आक्रमक आंदोलकांनी घेरला छगन भुजबळ यांचा फार्म, भेट देत नाही तोपर्यंत राहणार बसून
नाशिक: आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी, आज नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या फार्मला घेराव घातलेला आहे. भुजबळ यांचं निवासस्थान आणी कार्यालय या शहरातील फार्मला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आक्रमक आंदोलकांनी, जागोजागी लावलेले पोलीस लोखंडी बॅरिकेट्स पार करून जोरदार घोषणाबाजी करत, भुजबळ फार्मकडे वाटचाल केलेली आहे. अखेर फार्मच्या प्रवेशद्वारावर त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे. नियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ बाहेर गेलेले असल्यानं याच ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे.
जोपर्यंत पालकमंत्री छगन भुजबळ येणार नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही ही आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. यावर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आव्हान दिले जाईल. तसेच या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला दिलासा देण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे संकेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. त्यानुसार पुढील निर्णय लवकरच जाहीर होतील, असे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलेले आहे.