भारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमेवर तणाव आहे. चीनच्या मुजोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यातच चीन भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिंवर नजर ठेवत असल्याचंही उघड झालेलं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. चीन भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवत होता अशी माहिती बाहेर आलेली आहे.
चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केलेला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आलेली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे.