जगातील श्रीमंत देशांनी खरेदी केले कोरोना लसीचे ५० टक्के डोस
नवी दिल्ली – संपूर्ण जग पुन्हा आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र लस बाजारात उपलब्ध होण्याच्या आधीच अनेक श्रीमंत देशांनी लसीचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमने आपल्या अभ्यासात दावा केला आहे. जगाच्या १३ टक्के लोकसंख्या असलेल्या श्रीमंत देशांनी कोव्हिड-१९ लसीचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक डोस खरेदी करून साठा केला आहे.
श्रीमंत देशांनी लस बनविण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून अनेक करार केले आहेत. ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एनालिटिक्स कंपनी एअरफिनिटीद्वारे जमा करण्यात आलेल्या डेटानुसार अंतिम टप्प्यात असलेल्या ५ लसींसोबत करार करण्यात आला आहे. असे श्रीमंत देश ज्या देशांची लोकसंख्या एकूण जगाच्या १३ टक्के आहे, त्यांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लस खरेदी केली आहे.
ऑक्सफॅम अमेरिकेचे रॉबर्ट सिल्वरमॅन म्हणाले की, आयुष्य वाचवणारी लस तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे तुम्ही कुठे राहता आणि तुमच्याकडे किती पैसा आहे यावर निर्भर असते. एक सुरक्षित आणि प्रभावशाली लस तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा गरजेचे आहे की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ही लस सर्वांसाठी उपलब्ध व्हावी. ऑक्सफॅमने ज्या लसींचा अभ्यास केला आहे त्यात अॅस्ट्रेजेनका, स्पुटनिक-व्ही, मॉडर्ना, फाइजर आणि साइनोवॅक्सचा समावेश आहे. या ५ कंपन्यांमध्ये लसीचे ५९० कोटी डोस बनविण्याची क्षमता आहे.