पाकिस्तानात शिया दहशतीत, सुन्नींना हिंसेसाठी चालना देण्याचा इम्रान यांच्यावर आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/imran-khan.jpg)
पाकिस्तानात शिया व सुन्नी मुस्लिमांमध्ये संघर्ष वाढत आहे. पाकिस्तानात १९८० व ९०च्या दशकात झालेल्या हिंसाचारासारखी घटना होण्याची शियांना भीती आहे. तेव्हा शेकडो जण मारले गेले होते. गेल्या आठवड्यात सुन्नी मुस्लिम व दहशतवादी संघटनांनी कराचीत शिया मुस्लिमांविरोधात आंदोलन केले. त्यांनी दुकाने व इतर संस्था बंद पाडल्या. रास्ता रोको केला.
शियांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व सिपाह ए सबाह या दहशतवादी संघटनेने केले. आंदोलकांचे म्हणने आहे की, अशुरा जुलुसच्या टीव्ही प्रसारणावेळी शिया मौलवींनी इस्लामिक विद्वानांविरोधात अवमानजनक विधान केले. आता सोशल मीडियावर शिया नरसंहार हॅशटॅग ट्रेंड करत आहे. शिया विरोधी पोस्ट दिसत आहेत. २१ कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानात शियांची लोकसंख्या २०% आहे. आंदोलकांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नुकताच आशुरा जुलूसमध्ये सहभागी झाल्याबद्दल अनेक शिया मुस्लिमांवर हल्ले झाले.
मिरवणुकीवर हातगोळे फेकण्यात आले. रावळपिंडीतील प्रमुख शिया मौलवी अली रजा सांगतात, पंतप्रधान इम्रान खान या शिया विरोधी आंदोलनाला जबाबदार आहेत. सरकार हेतुपुरस्सर प्रक्षोभक वक्तव्यांना चालना देत असल्याचे वाटते. शियांना संदेश पाठवून त्यांना काफिर म्हटले जात आहे. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. सरकार आशुरा मिरवणुकांवर कारवाई करण्याची चर्चा इस्लामाबादमध्ये आहे.
कराची विद्यापीठातील शिया विद्यार्थी गुलर हसनैन सांगतात की, ते घाबरलेले आहेत. लष्करे ए जान्गवी व सिपाह ए सबाहचे हजारो जण एका ठिकाणी येऊन त्यांना काफिर म्हणतात. आम्हाला मारण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहेत. कराची विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक सोहेल खान सांगतात, सुन्नी मुस्लिमांच्या शक्ती प्रदर्शनानंतर पाकिस्तानात धार्मिक हिंसाचाराची शक्यता दिसते. तर पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज शहा यांच्यानुसार सर्व नियंत्रणात आहे.