‘वायसीएम’च्या रुग्णालयातील शवगृह बंद; मृतदेह ठेवायचे कुठे? नातेवाईकांना चिंता
![Head of Medical Department of YCM, the authority to purchase medicine up to Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ycm-photo.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामधील डेड हाऊस गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एवढ्या दिवसांपासून डेड हाऊस बंद आहे मात्र याबाबत प्रशासनाने सत्ताधारी पक्षाला खबरही लागू दिली नाही. एकीकडे रुग्णालयातील कर्मचारी शवगृह बंद असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयाचे अधिष्ठाता डेड हाऊस सुरू असल्याचे ठासून सांगत आहेत.
शहरामध्ये करोनाने उच्छाद मांडला आहे. दररोज सुमारे 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा, अपघात झालेल्यांचाही मृत्यू होत आहे. दूरच्या नातेवाईकांना मृतदेह लगेच नेणे शक्य होत नाही. तसेच नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे मृतदेह शवागृहात ठेवण्याची वेळ येते. मात्र त्याठिकाणी शवागृहातील कॉम्पेसर बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून शवागृह बंद आहे.
तिथे मृतदेह ठेवण्यासाठी नकार दिला जातो. प्रशासनाने देखावा म्हणून त्याठिकाणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत. मात्र त्यामध्येही मृतदेह ठेवला जात नाही. त्यामुळे नातेवाईकांना निम्म्या रात्री अंत्यविधी करण्यासाठी न्यावे लागते किंवा मृतदेह तसाच ठेवावा लागतो. मात्र याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
वायसीएम रुग्णालयातील डेडहाऊस मागील महिन्यापासून बंद आहे. मात्र याबाबत सत्ताधारी पक्षाला साधी माहितीही नव्हती. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी याबाबत निवदेन दिल्यावर सत्ताधारी खडबडून जागे झाले. त्यानंतर पक्षनेते नामदेव ढाके यांना फोनाफोनी सुरू केली. यावरून सत्ताधारी व प्रशासन शहरातील नागरिकांप्रती किती बेजबाबदारपणे वागत आहे याचा प्रत्यय येत आहे.