संभाव्य कलंक थोपविण्यासाठी भाजप पदाधिका-यांचे लोटांगण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/BJP-NCP.jpg)
- पालखी सोहळ्यातील भेट वस्तू ठरविण्याचा मान राष्ट्रवादीला
- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी घातले लक्ष
पिंपरी – विठ्ठल मुर्ती घोटाळ्याचे भांडवल करून सत्तेत आलेल्या भाजपच्या खोडीलपणाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यातील भेट वस्तू खरेदीत मनापासून लक्ष घातले आहे. त्याचा धसका घेतलेल्या सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी आपल्यावर लागणारा संभाव्य कलंक थोपविण्यासाठी भेट वस्तू खरेदीचा मान साने यांना दिला आहे. त्यासाठी पालिकेतील भाजपच्या पदाधिका-यांनी साने यांच्यापुढे लोटांगण घातले आहे.
दोन वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भेट वस्तू विठ्ठल मूर्ती खरेदी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर चहुबाजुनी घेरले होते. पारदर्शक कारभार आणि अशा त्रोटक भृष्टाचाराच्या मुद्यांवरून राष्ट्रवादीची पार कोंडी झाली होती. सत्तेची हवा डोक्यात शिरल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी या मुद्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पारडे पालटल्याने शहरात राष्ट्रवादीची धुळधाण झाली. हा पराभव मनात सलत असल्याने याचा वचपा काढण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने चांगलेच सक्रीय झाले आहेत. पक्षाच्या कलंकीत प्रतिमेवरील धब्बा नाहिसा करण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला कितपत यश येते, हा चिकित्सेचा मुद्दा आहे.
आषाढीवारीतील वारकऱ्यांना विविध संस्था, संघटना अथवा वैयक्तिक स्तरावर वस्तू, फळ किंवा अन्नदान केले जाते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भेटवस्तू द्याव्यात, असा निर्णय महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी घेतला होता. वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या भेटवस्तू द्याव्यात असा निर्णय घेऊन ही परंपरा पुढे चालवित आणली आहे. परंतु, राष्ट्रवादी आणि भाजपने आजपर्यंत टक्केवारीचे समिकरण समोर ठेवले होते. त्यावरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या प्रकरणात राष्ट्रवादीची ज्या पध्दतीने प्रतिमा मलिन झाली, तशीच ताडपत्री खरेदीवरून भाजपची प्रतिमा मागच्या दिंडीमध्ये मलिन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. मात्र, आता लोकसभा आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्षावर शिंतोडे उडण्याचा धस्का घेऊन भाजपच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीपुढे तलवार म्यान केली आहे. दिंडीतील भेट वस्तू निवडण्यापासून ते दर्जा ठरविण्यापर्यंतची जबाबदारी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यावर सोपविली आहे.
भेटवस्तू सुचविण्याचे सर्वाधिकार विरोधकांना बहाल
यंदा ६ जुलै रोजी आळंदी येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. त्यानिमित्त आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाची नियोजन बैठक दोन दिवसांपूर्वी पालिकेत पार पडली. यंदा अधिकमास असल्याने दिंडीचा कालावधी एक महिना पुढे जातो. ऐन पावसाच्या दिवसांतच दिंडीकरी व वारक-यांना नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. पावसापासून सुरक्षीतता बाळगण्यासाठी त्यांना तंबूचे साहित्य (उदा. ताडपत्री, रोप आणि स्टीक) भेटवस्ती देण्याचे दत्ता साने यांनी सूचविले आहे. याशिवाय अन्य कोणती वस्तू सुचवायचे अधिकारही सत्ताधा-यांनी साने यांच्याबरोबर गटनेत्यांना दिले आहे.