पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांची निवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आज (दि.7) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला. गटनेतेपदी मिसाळ यांची निवड झाल्याची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. 34 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असल्याने मिसाळ नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर उषा ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेत जनतेतून निवडून आलेले 36 नगरसेवक होते. त्यातील कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे.
पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल, दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने, तिस-यावर्षी चिंचवडमधील पिंपळे सौदागरचे प्रतिनिधीत्व करणारे नाना काटे यांच्याकडे पद देण्यात आले होते.