सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 1800 रुपयांनी झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/akshaya-tritiya-gold-7_201905233428.jpg)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सराफा बाजारात आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्राम मागे 614 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीची झळाळीही कमी झाली असून एक किलोचा दर 1799 रुपयांनी खाली आला आहे. येत्या काळात सोन्याचा दर आणखी खाली येण्याचा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 56 हजारांवर गेलेला सोन्याचा दर 52 हजारांवर आला आहे. आजच्या घसरणी नंतर दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार 928 वरून 52 हजार 314 रुपयांवर आला आहे. तर मुंबईत सोन्याचा दर 51 हजार 500 पेक्षाही खाली घसरला. मुंबईत सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 51 हजार 24 रुपये झाला.
दुसरीकडे चांदीचा दर देखील 74 हजारांहून खाली आला आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 1 किलो चांदीचा दर 71 हजार 202 रुपये झाला, तर मुंबईत 66 हजार 356 रुपयांवर स्थिरावला. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था उभारी घेईल आणि बाजारात तेजी पाहायला मिळेल, यामुळे सोने-चांदीचे दर आणखी खाली येतील.