औरंगाबादमध्ये वयोवृद्ध आजीला झाडाखाली ऑक्सिजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Aurangabad-Grandmother-on-road-with-oxygen-cylinder.jpg)
औरंगाबाद | कोरोना बाधितांवरील उपचारासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, औरंगाबादमध्ये रुग्णालयात बेड नसल्यानं थेट रस्त्यावर झाडाखील ऑक्सिजन लावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित कोरोना बाधित वयोवृद्ध आजीला बेड उपलब्ध नसल्याचं सांगत रस्त्यावर झाडाखाली ऑक्सिजन देण्यात आला. याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून औरंगाबाद आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर टीका होत आहे.
या आजींना जवळपास तासभर असाच उपचार घ्यावा लागला. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठल्यावर आजींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे कोविड सेंटरमध्ये 40 बेड उपलब्ध असतानाही आजींना बेड देण्यात आला नाही. या आजींना कोविड सेंटरमध्ये दाखल करुन न घेता रस्त्यावरच झाडाखाली ऑक्सिजन लावला. वाळूज परिसरातील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
दोन दिवसांपूर्वीच या वयोवृद्ध आजींच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. या शिवाय त्यांच्या घरातील इतर सदस्यही कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळतेय. अशात आरोग्य प्रशासनाकडून झालेल्या या बेजबाबदार कृतीचा नागरिकांकडून निषेध होत आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच कोरोनाबाधित आजींना झाडाखाली ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याचा आरोप होत आहे. बेड न मिळाल्याने या आजींवर जवळपास तासभर रस्त्यावर झाडाखाळी उपचार घेण्याची नामुष्की ओढावली.
औरंगाबादमधील वाळूज परिसरातील रुग्णालयातील बेड संपले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या आजींची प्रकृती ढासाळत चालली होती आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करेपर्यंत झाडाखालीच ऑक्सिजन लावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.