शाश्वत नागरी विकासासाठी इंग्लंड, डेन्मार्क आणि फ्रान्सबरोबर करार

- तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करारांना मंजुर
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाश्वत नागरी विकासासाठी तांत्रिक सहकार्य करण्याबाबत इंग्लंड, डेन्मार्क आणि फ्रान्सबरोबर झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
आणि इंग्लंडबरोबरच्या कराराअंतर्गत, नागरी विकास, घनकचरा व्यवस्थापन,परवडणारी हरित घरे, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी संस्थांची क्षमताबांधणी, नागरी भागात कौशल्यविकास, स्मार्ट नागरी वाहतूक योजना, वसाहतीकरण, शाश्वत आणि एकात्मिक नागरी नियोजन, पुनर्विकास अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य अपेक्षित आहे.
डेन्मार्कबरोबरच्य्या कराराअंतर्गत, माहिती-ज्ञान, संस्थात्मक सहकार्य, संशोधन आणि विकास तसेच व्यावसायिक संबध अधिक दृढ केले जाणार आहेत. स्मार्ट नागरी उपाययोजना, वसाहतीकरण, शाश्वत आणि एकात्मिक नागरी नियोजन, पुनर्विकास आणि जमिनीशी संबंधित प्रश्न अशा क्षेत्रात हे सहकार्य अपेक्षित आहे. त्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापन, उर्जाक्षमता अशाही विषयांवर दोन्ही देश परस्परांना मदत करतील.
फ्रान्सबरोबरच्या कराराअंतर्गत स्मार्ट शहर विकास, शहरातील सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा विकास, शहरी वस्त्या आणि सुविधा (पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन), घनकचरा विघटन आणि प्रक्रिया, लॅंडफिल रेमेडीशन, पाण्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया, तंत्रज्ञान हस्तांतरण, पाण्याचे संवर्धन, सार्वजनिक गृहनिर्माण, हरित घरे, शहर नियोजन, वारसा, मनुष्यबळ विकास, क्षमता निर्मिती आणि परस्पर हिताच्या क्षेत्रात तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे.
या करारांच्या अंमलबजावणीसाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल. ह्या कृतीगटाच्या वर्षातून एकदा, संबंधित देशामध्ये बैठका होतील. या करारांमुळे नागरी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दृढ. मजबूत आणि दीर्घकालीन संबंध निर्माण होतील. तसेच, कराराच्या अंमलबजावणीमुळे, घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापन, उर्जा अशा क्षेत्रात रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित आहे.





