यंदा बाप्पासाठी घरच्या मोदकाला भक्तांची पसंती; मिठाईच्या दुकानांकडे पाठ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Modak.jpg)
गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. फक्त दोनच दिवस राहिले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताची, सजावटीची तयारी करण्यात येत आहे. तसेच बाप्पाला आवडणारे मोदक, मिठाई, फराळ या सर्वांची जय्यत तयरी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भलेही घरच्या घरी का असेना पण मोठ्या उत्साहाने, आणि जय्यत तयारी मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही सुरुच आहे. दरवर्षी मिठाईसाठी दुकानात मोठ्या रांगा लागतात. परंतु, यंदा कोरोनामुळं भक्तांनी घरच्या घरी उकडीच्या मोदकाचा नैव्यद्य बाप्पाला दाखवण्याचा निर्णय घेतला असून, मिठाईच्या दुकानांकडं पाठ फिरवली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/modak-10_2017088200.jpg)
लॉकडाऊनपूर्वी मुंबईत दररोज साधारण ८० क्विंटल मिठाईची खरेदी-विक्री होते. कुठलाही उत्सव किंवा सणांच्या दिवशी ही उलाढाल १५० किलोच्या घरात जाते. पण, गणपतीच्या दहा दिवसांत मात्र ही मागणी ६०० क्विंटलहून अधिक होते. यंदा मात्र सार्वजनिक गणेशोत्सव अत्यल्प प्रमाणात असल्याने या मिठाई, तसेच मोदकांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/AAGAswg-1024x538.jpg)
अनेक जण शेजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी ते पेढे किंवा पेढ्यांच्या आकारातील मोदक प्रसादासाठी घेऊन जातात. मोठमोठ्या सार्वजनिक गणरायासाठीही भक्तमंडळी मोठ्या प्रमाणात मिठाईचा प्रसाद चढवतात. मात्र, यंदा मिठाईची उलाढाल कमालीची मंदावली आहे.
यंदा कोरोनामुळे ग्राहक मिठाई खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे उत्पादकही मर्यादित प्रकारचे मोदकच तयार करीत आहेत. भक्त मंडळी शास्त्रापुरती नाममात्र खरेदी करीत आहेत. त्यातही साध्या मिठाईलाच मागणी आहे.