अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
![The Supreme Court is ready to hear the petitions of 10th and 12th class students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court-1.jpg)
नवी दिल्ली – अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत संभ्रम हा अजूनही सुरुच आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशातील सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा घ्याव्यात असे निर्देश युजीसीने दिले होते याला विद्यार्थी संघटनांनी आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावरील सुनावणी आज (१८ ऑगस्ट) होणार आहे. आज तरी अंतिम निर्णय येईल का याकडे देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रातून युवा सेनेनेही याचिका दाखल करत या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पदवी परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घ्याव्यात या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांविरोधातील याचिकांवर शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. कोविड-१९ संक्रमण काळात परीक्षा घेण्यात कोणकोणत्या अडचणी आहेत, हे युवा सेनेचे वकील श्याम दिवाण आणि दिल्ली सरकारतर्फे युक्तीवाद करणारे अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.
युवा सेनेतर्फे वकील श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला. विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येत आहे, असे ते म्हणाले. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आपत्तालिन व्यवस्थापन कायद्यातील तरतूदी कठोरपणे राबवण्याचे अधिकार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश आहेत, असे दिवाण यांनी न्यायालायाच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षांसंदर्भातील मुद्दे दिवाण यांनी मांडले.