सांगली जिल्ह्यात पुराचे संकट; नदीकाठच्या 104 गावांतील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटिसा
सांगली जिल्ह्यात पुराचे संकट गडद होऊ लागले आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ३७ फुटांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे सांगलीसह जिल्ह्यातील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पावसाची संततधार आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पुराची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सांगलीत कृष्णेची पातळी ३७ फुटांवर पोहोचली. यामुळे शहरासह जिल्ह्यातील चारशेहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही आता सज्ज झाले आहे.
सांगली जिल्ह्यात वारणा धरण क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सोमवारी पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी, कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्यामुळे धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय अन्य नद्या, तलाव आणि ओढ्यांमधून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू आहे. सोमवारी रात्री सांगलीत आयर्विन पूल येथे पाणी पातळी ३७ फुटांवर पोहोचली. यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काका नगर, कर्नाळ रोड या परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या परिसरातील ४० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळी ३९ फुटांची आहे, तर धोका पातळी ४३ फूट एवढी आहे. धोका पातळीपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता गृहित धरूनच महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांची पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या १०४ गावांतील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. पुराचे पाणी इशारा पातळीवर पोहोचताच नागरिकांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी पोहोचावे, अशा सूचना पोलिस प्रशासनाकडूनही दिल्या जात आहेत.वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील पूरबाधित गावांमधील लोकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. सखल भागातील सुमारे तीनशेहून अधिक लोक सुरक्षित स्थळी पोहोचले आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे पलूस तालुक्यातील आमणापूर ते अंकलखोप या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला. तसेच कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना जोडणारा खोची-दुधगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन औदुंबर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यांत्रिक बोटी देण्यात आल्या.
सांगलीतील पूर नियंत्रणासाठी कृष्णा नदीतील पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या दोन योजनांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात हे पाणी पोहोचवले जात आहे. पाणी उपसा सुरू केल्यामुळे पूर नियंत्रणासाठीही मदत होणार आहे.