गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वीज कपात केली जाणार नाही; 24 तास वीज पुरवठा करण्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वीज कपात केली जाणार नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणात 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे.याबाबतचे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महावितरणच्या फोर्ट जवळील कार्यालयात नितीन राऊत आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठक पार पडली. तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी या ठिकाणी वीज कपात न करता 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहे.
तसेच रोहा येथे २२ केव्ही स्विचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात 2 हजार 800 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अति उच्चदाब उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल, असेही ते म्हणाले.
रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोठया शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यात यावी, असे नितीन राऊत यांनी सांगितले.





