कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका असा सल्ला देणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/203600-dr-anil-patil-vedicure.jpg)
मुंबई – देशात कित्येक महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली तेव्हा “कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका. हे निव्वळ एक चायनीज फॅड आहे”, असे विधान करून चर्चेत आलेले डॉक्टर अनिल पाटील यांचे निधन झाले आहे. मार्च महिन्यामध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची ही मुलाखत प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान, डायबिटीससह अन्य काही आजारांमुळे डॉक्टर अनिल पाटील यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
जुहूच्या आरोग्य निधी रुग्णालयात अनिल पाटील यांचे निधन झाल्याची माहिती मिळते. ते ५२ वर्षांचे होते. अनिल पाटील यांना डायबिटीससह अन्य काही आजार देखील होते. सुरुवातीला ते अनिल पाटील यांना मुलुंडमधील फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना किडनीचा त्रास देखील सुरु झाल्याने जुहूच्या आरोग्य निधी रुग्णालयात दाखल कारण्यात आले होते. मुंबईतील दादरमध्ये वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक अँड हॉस्पिटल या नावाने अनिल पाटील यांचे क्लिनिक होते. त्याचप्रमाणे, ते महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीकृत डॉक्टर होते.
“कोण आहे हा कोरोना ? कुठून आला हा कोरोना ? कोरोनाला कुणीही गांभीर्याने घेऊ नका. हे निव्वळ चीनचे फॅड आहे. कोणतीही भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारतातील उन्हाळ्यात हा व्हायरस टिकू शकणार नाही”, अशी काही विधाने अनिल पाटील यांनी मार्चमध्ये झालेल्या आपल्या मुलाखतीत केली होती. त्यानंतर, अशा पद्धतीच्या दाव्यांमुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून अनिल पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली होती.