ही वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं
![Environment Minister Aditya Thackeray to visit Kolhapur on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1582624904011_aaditya_thackeray.jpg)
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलेलं आहे. “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे”, अशी प्रतक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिलेली आहे.
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020
“सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. “मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाहीये. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.