#CoronaVirus | एका दिवसात ५५ हजार रुग्ण
मुंबई | गेल्या २४ तासात देशात आजवरचे सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात देशात ५५ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शिवाय मृतांचा आकडा देखील सर्वात जास्त आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल ७७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण आणि मृतांचा हा आकडा सतत वाढतच चालला आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता देखील वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
भारतात आतापर्यंत एकूण ३५ हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १५ लाख ३८ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण १५,३८,८७१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ३५,७४७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत १०,५७,८०६ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ५,४५,३१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.